goa: गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा

goa: गोव्यात काँग्रेसचा सत्तास्थापनेचा दावा
वृत्तसंस्था, पणजी

गोव्यात काँग्रेसने सरकारस्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ढासळलेली प्रकृती, भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे भाजपचे घटलेले संख्याबळ या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्यात आला आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ कवळेकर यांनी शनिवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यात सरकारस्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्यात सध्या निर्नायकी अवस्था असल्यामुळे राज्यातील भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही कवळेकर यांनी केली. गोवा विधानसभेत एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी म्हापशाचे भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे नुकतेच निधन झाले. मांद्रे येथील काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या तिन्ही मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीबरोबरच २३ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. सध्या भाजपचे १३ आमदार असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार भाजपसोबत आहेत. काँग्रेसकडे १४ आमदार आहेत. कवळेकर यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डिसोझा यांचे निधन आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांचे प्रकृतीअस्वास्थ्य यामुळे सरकारने सभागृहातील बहुमत गमावले आहे. त्यामुळे आपण राज्यातील भाजपचे सरकार बरखास्त करावे आणि बहुमत असलेल्या काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे.’

पर्रीकरांची उणीव भासणार

गोव्याचे मुख्यमंत्री आणि राज्यात भाजपची धुरा एकहाती सांभाळणारे मनोहर पर्रीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होऊ शकणार नाही. राज्यात शब्दाला वजन असणारा आणि पक्षाला खंबीर नेतृत्व देऊ शकणारा दुसरा नेता भाजपकडे नसल्यामुळे पक्षाला त्यांची उणीव भासणार आहे.

गोव्यातील पक्षीय बलाबल

एकूण जागा – ४० (सध्या – ३७)

बहुमतासाठी आवश्यक – २१ (सध्या – १९)

काँग्रेस -१४

भाजप -१३

मगोप -३

गोवा फॉरवर्ड – ३

राष्ट्रवादी काँग्रेस- १

इतर – ३