पर्रीकरांची प्रकृती ढासळली

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ढासळली असली, तरी स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी दिली. सरदेसाई यांनी शनिवारी पाच आमदारांसह पर्रीकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यात त्यांच्या पक्षाचे जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर यांच्यासह रोहन खावटे, गोविंद गावडे आणि प्रसद गावकर या तीन अपक्ष आमदारांचाही समावेश होता. ‘मुख्यमंत्र्यांची प्रकृती ढासळली असली, तरी स्थिर आहे. आम्ही त्यांच्यासोबतच आहोत. त्यांच्या आजाराची नेमकी माहिती सांगता येणार नाही. मात्र, त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास सुरू नाही,’ असे सरदेसाई यांनी सांगितले. राज्यात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता सरदेसाई यांनी फेटाळली.