सिडकोच्या घरांसाठी आज सोडत

नवी मुंबई : सिडको महागृहनिर्माण योजना ऑगस्ट २०१८मधील शिल्लक राहिलेल्या ११०० सदनिकांसाठी सिडकोतर्फे १ जानेवारी २०१९ रोजी जाहीर करण्यात आलेल्या गृहनिर्माण योजनेची सोडत आज, गुरुवारी काढण्यात येणार आहे.

ही गृहनिर्माण योजना नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या ५ नोड्समधील एकूण ११ ठिकाणी साकार होत आहे. एकूण ११०० सदनिकांपैकी ७३ सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, तर उर्वरित १०२७ सदनिका या अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २५.८१ चौ.मी. आहे. अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध सदनिकांचे चटई क्षेत्रफळ २९.८२ चौ.मी. आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तळोजा येथे ३९ व द्रोणागिरी येथे ३४ सदनिका आहेत. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे ६५०, खारघर येथे ५९, कळंबोली येथे ५३, घणसोली येथे ४३ व द्रोणागिरी येथे २२२ सदनिका उपलब्ध आहेत. गुरुवारी १४ फेब्रुवारी रोजी या योजनेची सोडत सिडको सभागृह, सातवा मजला, सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.